Friday, 10/01/2025

राज्यांमधील विविध रस्त्यांसह मुंबई- नाशिक रस्त्याची दुरावस्था पराकोटीची - आमदार थोरात

राज्यांमधील विविध रस्त्यांसह मुंबई- नाशिक रस्त्याची दुरावस्था पराकोटीची - आमदार थोरात
नाशिक-मुंबई मार्गावरील वाहतूक कोंडीची ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांनी केली अधिवेशनात पोलखोल;
सरकारचे मागील वर्षीचे ३१ मार्चपर्यंतचे आश्वासन हवेतच विरले!
संगमनेर (प्रतिनिधी) गेल्या पावसाळी अधिवेशनात नासिक मुंबई मार्गाच्या वाहतूक कोंडीवर प्रकाश टाकल्यानंतर ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना मागील ३१ मार्चपूर्वी या रस्त्याचे काम पूर्णत्वास नेले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र ३१ मार्च उलटून गेल्यानंतर देखील या मार्गाची अवस्था पूर्वीपेक्षा अधिक भीषण झाल्याचे वास्तव असून राज्यातील अनेक रस्त्यांची व मुंबई -नाशिक रस्त्याची  दुरावस्था पराकोटीची झाली असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज पुन्हा सभागृहात केल्याने सरकारने दिलेले आश्वासन हवेतच विरल्याचे दिसून आले.
मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेस पक्षाचे नेते आमदार थोरात यांनी गुरुवारी स्थगन प्रस्तावाद्वारे हा विषय पुन्हा एकदा सभागृहासमोर मांडला. यासाठी त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांचा देखील दाखला दिला. ते म्हणाले, मुंबई ते नाशिक या 170 किलोमीटर अंतरासाठी पूर्वी  तीन तासाचा कालावधी लागत होता. आता तो सहा ते आठ तासांवर गेला आहे. मागील वर्षी पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता? आणि त्यावेळेस आश्वासित करण्यात आले होते की, काही झाले तरी ३१ मार्च पर्यंत या रस्त्यांची व्यवस्था चांगली करू कोणतीही अडचण राहणार नाही, आणि लोकांनी ते मागील वर्षी सहनही केले. आता यावर्षी त्यापेक्षाही गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे.
वाहनांच्या लांबच लांब रांगांचा सामना करावा लागतो, एक एक तास गाडी पुढे जात नाही. असे तिन-चार तास वाहतूक कोंडीत जात आहे. या वाहतूक कोंडीत लहान मुले ,महिला, अनेक आजारी पेशंट असे अनेक लोक असतात. या सर्व कोंडीसाठी कोणतीही पर्याय व्यवस्था केलेली नाही. सरकारचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे, त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे, हा प्रश्न गंभीर आहे. तातडीने याच्यावर उपाययोजना करून यांवर तातडीने मार्ग काढून वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवावा लागेल अशी मागणी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत केली आहे