Friday, 10/01/2025

खासदार सुजय विखे यांनी जिल्ह्यात किती उद्योग आणून तरुणांच्या हाताला काम दिले हे सांगुन मते मागावित - निलेश लंके

अहमदनगर : श्री. महेंद्र मगर, उपसंपादक- अहमदनगर जिल्हा, मासिक ग्रामपंचायत आणि सरपंच :
पाच वर्ष लोक संपर्कात न राहता खासदार सुजय विखे यांनी जिल्ह्यात किती उद्योग आणून तरुणांच्या हाताला काम दिले हे सांगून मते मागावीत, इंग्लिश भाषा येते का म्हणून आम्हाला हिणवू नका, कामावर मते मागा उगाच आमच्यावर गुंडगिरीचा आरोप करू नका असा घनाघाती आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी केला. ते खर्डा येथे आयोजित जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून कॉर्नर सभेत बोलत होते. 
यावेळी आमदार रोहित दादा पवार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, राजेंद्र कोठारी,मधुकर आबा राळेभात,दत्तात्रय वारे, सूर्यकांत मोरे, तालुका अध्यक्ष विजयसिंह गोलेकर,मंगेश आजबे, बिरंगळ साहेब,संजय वराट,सुरेश भोसले,सदाफुले, इत्यादी सह स्थानिक पदाधिकारी सह खर्डा सोसायटीचे चेअरमन, व्हॉइस चेअरमन व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
ते बोलताना पुढे म्हणाले की, विखे मला गुंड म्हणतात परंतु सुपा येथील एमआयडीसी माननीय शरदचंद्र पवार यांनी मंजूर करून आणली होती, त्या एमआयडीसीला संरक्षण व उद्योग वाढीसाठी आम्ही प्रयत्न केले त्यामुळे हजारो तरुणांच्या हाताला काम मिळाले आहे. खासदार सुजय विखे यांनी आजपर्यंत खर्डा व परिसराला किती गावांना भेटी दिल्या व किती व रुपयांचा निधी दिला हे सांगावे आमदार खासदारांनी लोकसंपर्कात राहून जनहिताची कामे करायची असतात, बेछूट आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचे दिवस आता संपले आहेत असा आरोपही निलेश लंके यांनी यावेळी केला. 
आमदार रोहित दादा पवार म्हणाले की, या महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांच्या दुधाला भाव कमी दिला व मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पराग दूध संघाला जास्तीचा फायदा व्हावा म्हणून 80 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. शेतकऱ्यांच्या कोणत्याही मालाला भाव नाही महागाईने जनता त्रस्त झाली आहे. कर्जत एमआयडीसी संदर्भात आमदार राम शिंदे हे एमआयडीसीला तत्वतः मान्यता मिळाली म्हणून जनतेची दिशाभूल करीत आहेत, आम्ही मंजूर करून आणलेल्या जागेवरच एमआयडीसी मंजूर करू तसेच मी आणलेल्या विकास कामांना खीळ घालण्याचे काम आ. शिंदे यांनी केले आहे, त्यामुळे आपल्या विचाराचा खासदार व्हावा म्हणून निलेश लंके यांना लोकसभेत पाठवण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित जनतेला केले. 
याप्रसंगी अनेक गावच्या कार्यकर्त्यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. जनसंवाद यात्रेचे खर्डा शहरात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले, यावेळी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. या सभेचे प्रास्ताविक व आभार दत्तराज पवार यांनी मानले.