Friday, 10/01/2025

अहमदनगरमध्ये डॉ. सुजय विखे विरुद्ध निलेश लंके लढत

अहमदनगर : श्री. महेंद्र मगर, उपसंपादक- अहमदनगर जिल्हा, मासिक ग्रामपंचायत आणि सरपंच :
भाजपकडून काही दिवसांपूर्वी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी पुन्हा एकदा सुजय विखे पाटील यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून सुजय विखे पाटील यांच्या विरोधात तगडा उमेदवार शोधला जात होता. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे आता डॉ. सुजय विखे विरोधात निलेश लंके असा सामना रंगणार आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. निलेश लंके यांनी कालच आपल्याआमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज त्यांना शरद
पवार गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात आता निलेश लंके विरुध्द सुजय विखे पाटील अशी लढत होणार आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पहिली उमेदवारी जाहीर
वर्धा - अमर काळे
दिंडोरी - भास्करराव भगरे
बारामती - सुप्रिया सुळे
शिरुर - डॉ. अमोल कोल्हे
अहमदनगर - निलेश लंके
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज (30 मार्च) लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. बारामतीमधून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिरुरमधून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनाच पुन्हा एकदा संधी देण्यात आलीये. अहमदनगरमधून निलेश लंके यांच्या उमेदवारीची घोषणा केली गेली.
वर्ध्यामधून अमर काळे, तर दिंडोरीमधून भास्करराव बगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे अहमदनगरमधील पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी काल (29 मार्च) आमदारकीचा राजीनामा दिला होता. अहमदनगरमधील पारनेरमध्ये निलेश लंके यांनी समर्थक कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. भाषणादरम्यान निलेश लंके म्हणाले की, 'आमदारकीसाठी संघर्ष केला, आता खासदारकीसाठी संघर्ष करायचा. त्यासाठी आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल.'
आताच ईमेलद्वारे राजीनामा पाठवत आहे, असं सांगत निलेश लंकेंनी राजीनाम्याचं पत्र भर सभेत उपस्थितांना दाखवलं.
शरद पवार यांच्या नेतृत्वात आपण पुढे जायचं आहे. मधल्या काळात पवार साहेबांना आपण दुःख दिलं, ते भरून काढायचं, असंही लंके यांनी यावेळी म्हटलं होतं. शिरुरमध्ये अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील लढत होणार शिरुरमधून शरद पवार गटाने डॉ. अमोल कोल्हेंना उमेदवारी दिली आहे. त्यांची उमेदवारी जवळपास निश्चितच होती. मोशी येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या एका मेळाव्यात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अमोल कोल्हे हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, अशी घोषणा केली होती. अलीकडेच मंचरमध्ये झालेल्या सभेत कोल्हेंनी प्रचाराचे रणशिंग फुंकले होते. दुसरीकडे महायुतीत ही जागा शिंदे गटाकडे जाणार की अजित पवार गटाकडे यासंबंधी चर्चा सुरू होत्या. या जागेचा सस्पेन्स आता संपला आहे.
अजित पवार गटाकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच अजित पवार गटात प्रवेश केला होता.
2019 च्या निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला होता.