Friday, 10/01/2025

अकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, काही भागांत गारपीट

दिलीप कराळे, विदर्भ विभाग संपादक, संपर्क.९०११९८१२९९ :
अकोट (अकोला) :- अकोला जिल्ह्यासह अकोट तालुक्यात मंगळवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील बहुतांश भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. वादळी वारे सह झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील आंबे, लिंबू, केळी या फळवर्गीय पिकांना फटका बसला. 
गेल्या दोन तीन दिवसांपासून या भागात कमालीचा उष्मा जाणवत आहे. मंगळवारी दुपारी अचानक वातावरणात बदल झाला. आकाशात ढग जमू लागले आणि सायंकाळी पाऊस झाला. सोसाट्याचा वारा असल्याने काही घरांवरील टीनपत्रे उडाले. दरम्यान, काही भागात गारपीट झाली. या पावसामुळे लगतच्या भागातील आंबे, लिंबू तर बागायती क्षेत्रातील केळीचे नुकसान झाले.
 तालुक्यात २३ एप्रिल ४ वाजताच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट झाली आहे. निसर्गाच्या या लहरीपणाचा फटका फळबागांसह रब्बी हंगामातील काढणीला आलेल्या पिकांनाही बसला. त्यामुळे घरांचे व शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.