श्री. संकेत सानप - मंत्रालय प्रतिनिधी, मासिक ग्रामपंचायत आणि सरपंच :
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त नियोजनाची बैठक लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत अमृता लाॅन्स, घुलेवाडी येथे आज संपन्न झाली. महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचाराच्या नियोजनाबाबत ही बैठक आयोजित करण्यात आली होती.<br>या बैठकीसाठी माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार लहूजी कानडे, शिर्डी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे, मा.आमदार डॉ सुधीर तांबे, शिवसेनेचे रावसाहेब खेवरे, कॉम्रेड डॉ. अजित नवले आदींसह संगमनेर, अकोले, श्रीरामपूर, राहता, कोपरगाव, नेवासा, राहुरी, येथील महाविकास आघाडीच्या सर्व मित्र पक्षांचे विविध पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.<br>यावेळी आ. थोरात म्हणाले की, देशात वाढलेली महागाई व बेरोजगारी याचबरोबर महिलांचे, शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत. मात्र यावर सरकार बोलत नसून धार्मिकतेचे मुद्दे पुढे केले जात आहेत. भाजपाच्या फसव्या जाहिरातबाजीला लोक कंटाळले असून राज्यात महायुतीच्या विरोधात मोठी लाट आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मोठे यश मिळणार असून अहमदनगर जिल्ह्यात अत्यंत चांगले वातावरण आहे. आपसातील मतभेद दूर करून सर्वांनी एक महिनाभर अत्यंत चांगले नियोजन करा. जन कल्याणाचा महाविकास आघाडीचा विचार सर्वांनी घराघरात पोहोचवावा असे आवाहन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी याप्रसंगी केले.